Best Leading Eye Hospital in Pune | Best Eye Specialist In Pune

Types of Cataracts

Understanding the Different Types of Cataracts

मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग(लेन्स) धूसर, ढगाळ अथवा अपारदर्शक होणे. उत्तम दृष्टी करता लेन्स पूर्णपणे पारदर्शक असणे आवश्यक असते. सामान्यपणे, डोळ्यावर पडणारी प्रकाश किरणे डोळ्याच्या समोरील पडद्यावर म्हणजेच कॉर्नियावर पडून त्यानंतर बाहुलीमधून नैसर्गिक भिंगाद्वारे डोळ्याच्या मागील पडद्यावर म्हणजेच रेटीनावर केंद्रीत होतात. रेटीना त्यांना संकेताच्या स्वरूपात डोळ्याच्या मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहचवण्याचे कार्य करतो. जेव्हा लेन्सची पारदर्शकता कमी होते म्हणजेच मोतीबिंदू होतो तेव्हा डोळ्यावर पडणारी प्रकाशकिरणे रेटिनापर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो आणि रुग्णाला अस्पष्ट दिसू लागते. हा अस्पष्टपणा काळानुसार वाढतच जातो.

मोतीबिंदू होण्याची कारणे:

 • उतारवय.
 • मधुमेह.
 • खूप वर्षांसाठी सतत प्रखर सूर्यप्रकाशात वावर (सूर्याची अतिनील किरणे).
 • धूम्रपान व दारूचे सेवन.
 • डोळ्याला मार लागणे.
 • स्टिरॉइड्सचे दीर्घकाळासाठी सेवन.
 • बालकांमध्ये जन्मतः मोतीबिंदू आढळणे.

मोतीबिंदूची लक्षणे:

 • अस्पष्ट किंवा धूसर दिसणे.
 • चष्म्याचा नंबर वारंवार बदलावा लागणे.
 • रंग फिकट दिसणे.
 • रात्रीच्यावेळी स्पष्ट न दिसणे.
 • रात्रीच्यावेळी प्रकाशाभोवती वलय दिसणे.
 • प्रकाशामध्ये प्रखरता जाणवून डोळे दुखणे.
 • दुहेरी दिसणे.

मोतीबिंदूचे प्रकार:

मुख्यतः उतारवयात उद्भवणाऱ्या मोतीबिंदूचे प्रकार खालीलप्रमाणे:

१. न्यूक्लियर (कॅटरॅक्ट) मोतीबिंदू:

या प्रकारात लेन्सच्या मध्यवर्ती भागामध्ये मोतीबिंदू तयार होतो. हळूहळू तो वाढत जातो आणि प्रथम पिवळसर, नंतर तपकिरी व त्यानंतर काळसर होऊन तो अधिकाधिक कठोर बनत जातो. याला ‘न्यूक्लियर स्क्लेरॉसीस’ म्हटले जाते.

२. कॉर्टिकल (कॅटरॅक्ट) मोतीबिंदू:

यामध्ये मोतीबिंदूची सुरुवात लेन्सच्या परिघावरून म्हणजेच कोपऱ्यावरून होते, त्यावेळी रुग्णाची दृष्टी स्पष्ट असते. ज्यावेळी मोतिबिंदू हळूहळू मध्यवर्ती भागाकडे पसरू लागतो तेव्हा दृष्टी कमी होऊ लागते. काही काळानंतर संपूर्ण लेन्स मोत्यासारखी पांढरी होते, ज्याला सर्वसामान्यांच्या भाषेत ‘मोतीबिंदू पिकणे’ असे म्हटले जाते.

३. पोस्टेरिअर सबकॅप्स्यूलर (कॅटरॅक्ट) मोतीबिंदू:

या प्रकारात लेन्सच्या मागील भागात मोतीबिंदू तयार होतो. या प्रकारचा मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना ज्याप्रमाणे काचेवर वाफ धरावी आणि धुसर दिसावे तसा अनुभव येतो.

याशिवाय

कंजेनायटल (कॅटरॅक्ट) मोतीबिंदू:

म्हणजेच जन्मतः मोतीबिंदू असणे. बाळ गर्भात असताना आईला आजार झाल्यास त्याचे गर्भाशयात संक्रमण होणे, गर्भवती असताना आईला औषधांचे सेवन करावे लागणे  किंवा काही अनुवंशिक कारणांमुळे बालकांमध्ये जन्मतः मोतीबिंदू आढळून येतो.

ट्रॉमॅटीक (कॅटरॅक्ट) मोतीबिंदू:

डोळ्याला मार लागल्यामुळे कालांतराने मोतीबिंदू तयार होतो. त्याला या प्रकारात गणले जाते.

 

मोतीबिंदूचे निदान योग्य वेळेस व्हावे यासाठी,

-सर्ववयोगटातील व्यक्तींनी, विशेषतः वयाच्या चाळिशीनंतर वेळोवेळी नेत्रविकारतज्ज्ञांकडून डोळ्यांची व चष्म्याच्या नंबरची तपासणी करून घ्यावी.

-डोळ्यासंबंधीत कोणतीही समस्या असल्यास नेत्रविकारतज्ज्ञांकडून रितसर तपासणी करून त्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार घ्यावेत. त्यांच्या सल्ल्याशिवाय औषधे किंवा ड्रॉप्स टाकणे टाळावे.

-आहारामध्ये गाजर, पालक, टोमॅटो, संत्री अशा अ, ब, क जीवनसत्व असलेल्या आणि अँटी ऑक्सिडंट युक्त पदार्थांचा समावेश करावा.

-दारू, सिगरेट, तंबाखू आदी व्यसनांपासून दूर रहावे.

-कोणत्याही प्रकारच्या रेडिएशन्स च्या सान्निध्यात अथवा प्रखर सूर्यप्रकाशात सतत वावर करावा लागत असल्यास संरक्षणात्मक चष्मा व उपायांचा अवलंब करावा.

-मधुमेह, रक्तदाब असल्यास त्यावरील औषधोपचार नियमित घेऊन त्यांना नियंत्रणात ठेवावे.

 

भारतामध्ये अंधत्व असणाऱ्यांपैकी सुमारे ५०-८०% अंधांना मोतीबिंदू आढळून येतो. मोतीबिंदूचे योग्य वेळेस निदान झाल्यास त्यापासून मुक्ती मिळवणे सोपे आहे.मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया हाच एकमेव उपचार आहे. परंतु, अद्ययावत तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक मशिन्स, लेसर आणि शस्त्रक्रियेच्या सुलभ पद्धती उपलब्ध आहेत. त्याविषयी जाणून घेऊ पुढील लेखात.

डॉ. अंबरीश दरक
डॉ. अमिता कुलकर्णी
नेत्रविकार तज्ञ व नेत्रशल्यचिकित्सक,
व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन