लॅसिक म्हणजे (लेसर-असिस्टेड इन-सिटू केराटोमायलिसिस ) ही एक प्रकारची रिफ्रॅक्टिव सर्जरी (चष्म्याचा नंबर घालवण्याची शस्त्रक्रिया) आहे. या शस्त्रक्रियेत डोळ्याच्या समोरच्या पारदर्शक पडद्याचा (कॉर्नियाचा) आकार बदलून रुग्णाची दृष्टी स्पष्ट करण्याचे कार्य केले जाते. या लेखातून आपण आज लॅसिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊयात.
डोळ्याच्या समोरच्या पारदर्शक पडद्याला ’कॉर्निया’ असे म्हणतात. डोळ्यांवर येणारी प्रकाश किरणे प्रथम या पडद्यावर (कॉर्नियावर) पडून नंतर त्यामागे असणाऱ्या लेन्स म्हणजेच भिंगामधून डोळ्याच्या मागच्या पडद्यावर म्हणजेच रेटिनावर एकत्र येतात. आणि डोळ्याच्या अशा रचनेमुळेच आपल्याला स्पष्ट दिसते.
डोळ्यांच्या या रचनेमधील थोड्याश्यादेखिल बदलामुळे प्रकाशकिरणे रेटिनावर योग्य पद्धतीने पोहोचत नाही. आणि त्यामुळे अस्पष्ट दिसू लागते. याला रिफ्रॅक्टिव एरर म्हटले जाते. त्याचे प्रकार पुढीलप्रमाणे.., १.मायोपिया- डोळ्यांचा आकार लांबला असल्याने व्यक्तीला दूरच्या गोष्टी अस्पष्ट दिसतात. २.हायपरमेट्रोपिया- डोळ्यांचा आकार दबला असल्याने व्यक्तीला जवळच्या गोष्टी दिसण्यास अडचण येते. ३.अस्टिग्माटीझम (दृष्टीवैषम्य )- डोळयांच्या रचनेच्या असामन्यतेमुळे निर्माण होणारी दृष्टीची अस्पष्टता. या तिन्ही प्रकारच्या तक्रारींवर (एररवर) लॅसिक शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते.
लॅसिक शस्त्रक्रियेद्वारे लेसरच्या माध्यमातून कॉर्नियाच्या आकारात बदल करून डोळ्यावर पडणारी प्रकाशकिरणे रेटिनावर फोकस केली जातात ज्यामुळे अचूकपणे रेटिनावर प्रतिमा तयार होते. आणि रुग्णांना चष्म्याशिवाय स्पष्ट दिसू लागते.
लॅसिक शस्त्रक्रिया करायची असेल तर.. १. व्यक्तीचे वय १८ पेक्षा जास्त असावे. २. रुग्णाच्या चष्म्याचा नंबर कमीत कमी ६ ते १२ महिने तरी स्थिर असावा. ३. डोळे निरोगी असावेत. ४. शस्त्रक्रियेपूर्वी किमान दोन आठवडे तरी रुग्णाने कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणे बंद केले असावे.
लॅसिक शस्त्रक्रियेची पात्रता निर्धारित करण्यासाठी रुग्णाच्या डोळ्यांच्या काही आवश्यक चाचण्या केल्या जातात. जसं की, -रुग्णांची दृष्टी, चष्म्याच्या नंबरची तपासणी, डोळ्यांचा दाब, क्लिनिकल मूल्यांकन. -रेटिनाची तपासणी -कॉर्नियल टोपोग्राफी मशीनद्वारे कॉर्नियाची वक्रता व जाडी यांची तपासणी -डोळ्यांच्या बाहुल्यांचा आकाराची तपासणी, जेणेकडून शस्त्रक्रियेनंतर विशेषतः रात्रीच्या वेळेसही स्पष्ट दृष्टी मिळण्यास मदत होते. -डोळ्यांतील अश्रूंचे प्रमाण आणि ओलावा याची देखील तपासणी केली जाते.
लॅसिक शस्त्रक्रियेची प्रक्रिया: या शस्त्रक्रियेत कॉर्नियामध्ये फ्लॅप तयार केली जाते. फ्लॅप तयार करण्यासाठी मायक्रोकरेटोम (ब्लेड) हे साधन किंवा फेमटो सेकंड लेसर (ब्लेडलेस) वापरले जाते. नंतर फ्लॅपला अलगद उचलून दुमडले जाते. आणि त्या खालील भागाला लेसरने आकार दिला जातो. जर तुम्हाला दूरचे पाहायचा चष्मा (मायोपिया) असेल तर तुमच्या कॉर्नियाच्या भागाला लेसरने सपाट केले जाते. जर तुम्हाला जवळचे पाहायचा चष्मा (हायपरमेट्रोपिया) असेल तर तुमच्या कॉर्निया च्या भागाची वक्रता लेसरने वाढवली जाते. त्यानंतर फ्लॅप पुन्हा पूर्वस्थिती ठेवला जातो. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही दिवस संरक्षणात्मक चष्मा वापरण्याचा सल्ला दिला जातो. जंतूसंसर्ग आणि जळजळ टाळण्यासाठी आणि डोळे ओले ठेवण्यासाठी आयड्रॉप्स दिले जातात. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही सूचना दिल्या जातात. त्याचे काटेकोरपणे पालन करणे ही रुग्णाची जबाबदारी असते. अशाप्रकारे, तज्ज्ञ नेत्रशल्यचिकित्सकांकडून, व्यक्तीची शारीरिक पात्रता पाहून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि मशिन्सच्या साहाय्याने केलेली लॅसिकची शस्त्रक्रिया नक्कीच लाभदायक ठरते.